
पूर्ववैमनस्यातून हडपसर परिसरात पुन्हा एका सराईताचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. तीन दिवसांपूर्वी भेकराईनगरमध्ये एका सराईतावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. त्यामुळे हडपसर परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत.
बसवराज उर्फ बश्या कांबळे (वय 23) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
बसवराज हडपसर पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून तो परिसरातील ७२ ग्रुपचा अध्यक्ष होता. काल मध्यरात्री बसवराज एका ठिकाणी बसला असताना अज्ञातांनी त्याचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पूर्ववैमनस्यातून बसवराजचा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच हडपसरमधील भेकराई परिसरात सराईत गुन्हेगार शोएब शेख याचा तिघांनी कोयत्याने वार करून खून केला होता. त्यानंतर आज पुन्हा सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याने हडपसरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांचा वचक कमी झाल्यानेच कायदा व सुव्यवस्था राहिली नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. हडपसर परिसरात दररोज मारहाणीच्या घटना घडत आहेत. त्यानंतर वादातून खुनाच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.




























































