नदीकाठच्या चारशे कुटुंबांचे स्थलांतर; घरे, दुकाने, सोसायट्यांत पाणी

शहरात जोरदार सुरू असलेला पाऊस व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग वाढविला होता. त्यामुळे नदीकाठावरील सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगर, वारजे येथील रजपूत झोपडपट्टी, तपोधाम, येरवडा भागात फुलेनगर, चिमा गार्डन, पर्णकुटी, शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट, ताडीवाला रस्ता आदी नदीकाठच्या भागातील सोसायटी, घरांमध्ये पाणी शिरले. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर या प्रशासनाने पूरबाधित परिसरातील 404 कुटुंबांतील 1498 नागरिकांचे पालिकेच्या 12 निवारा केंद्रांत तात्पुरते स्थलांतर केले होते.

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे शंभर टक्क्यांच्या आसपास भरली आहेत. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्याचा येवा लक्षात घेऊन मंगळवारी धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली. मंगळवारी रात्री 39 हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवला. परिणामी रात्री उशिरा नदीकाठावरील सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगर, वारजे येथील रजपूत झोपडपट्टी, तपोधाम, येरवडा भागात फुलेनगर, चिमा गार्डन, पर्णकुटी, शांतीनगर, विश्रांतवाडी, साईनाथनगर, बोपोडीतील आदर्शनगर, मंगळवारपेठ, नागझरी नाला, भीमनगर, शिवाजीनगर येथील पाटील वाडीवाला रस्ता आटी नदीकाठच्या भागातील सोसायटी, घरांमध्ये पाणी शिरले. मात्र, महापालिकेची यंत्रणा मदतीसाठी तैनात करण्यात आली होती. महापालिकेने पूरबाधित 404 कुटुंबांतील 1498 नागरिकांना पालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरते स्थलांतर केले. महापालिकेने संबंधित 33 ठिकाणी एकूण 71 मदत केंद्रांची स्थापना केली आहे. या ठिकाणी महापालिका सहायक आयुक्त कार्यालयाकडून सर्च अँड रेस्क्यू टीम उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे नजीकच्या ठिकाणी मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था व त्याप्रमाणे आवश्यक आरोग्यासह आवश्यक त्या सर्व बाबींची व्यवस्था केली होती. नागरिकांना मेगाफोनद्वारे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणेबाबत सूचना दिल्या जात आहेत. पाण्याचे उपसा करणारे पंप तैनात करण्यात आलेले आहेत. किमान 25 कामगारांचे पथक तैनात केलेले आहे.

महापालिका आयुक्त नचल किशोर राम यांनीदेखील एकतानगर येथे घटनास्थळी जाऊन पूरपरिस्थितीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. तर, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी वारजे, कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय व येरवडा क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी पुराने बाधित होणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली आहे.

सेनादलाकडून एक टीम तैनात
महापालिकेसाठी सेना दलाकडून 1 टीम तैनात ठेवण्यात आली असून, त्यामध्ये 1 अधिकारी, 5 जेसिओ व 85 जवान यांची नियुक्ती करण्यात आली असून, समन्वय अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षात नियुक्त करण्यात आले आहेत. सैन्यदलासोबत आवश्यक ती सर्व साधनसामग्रीचा समावेश आहे.

येथे करा संपर्क
पुरामुळे शहरातील नागरिकांना तत्काळ मदतकार्य उपलब्ध होण्यासाठी महापालिकेने संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. आपत्ती काळात या क्रमांकांवर संपर्क साधून मदत मिळवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. यामध्ये महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक 020-25501269, 020-25506800, 020-67801500, अग्निशमन विभाग 101, 020-26442010, सिंचन भवन, पुणे 020-26127309, 020-26127067.