
हॉटेलमध्ये झालेल्या वादावादीतून हॉटेलमालक आणि वेटरने दोन ग्राहकांवर चाकुने करत त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री मांगडेवाडी भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी हॉटेलमालकासह दोघांना अटक केली आहे.
मनोहर रघुनाथ मांगडे (वय 44), ऋषिकेश जयसिंग देशमुख (वय 30, दोघे रा. मांगडेवाडी, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत निशांत जाधव (वय 25, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. जाधव आणि त्यांचा मित्र मांगडेवाडी भागातील मल्हार फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी जाधव आणि त्यांचा मित्र मोठ्याने गप्पा मारत होते. त्यामुळे हॉटेलमालक मांगडे आणि वेटर देशमुख यांनी जाधव यांना मोठ्याने बोलू नका, असे सांगितले.
या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. याच वादावातीतून मांगडे आणि देशमुख यांनी जाधव आणि त्यांच्या मित्रावर चाकूने वार केले. या घटनेत चौघे जखमी आहेत. हॉटेलमधील वेटरने दोघांना बांबूने मारहाण केली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मांगडे आणि देशमुख यांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात पुढील तपास करत आहेत.






























































