पुण्यात संशयातून पतीनेच केला पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला, महिला जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चारित्र्याच्या संशायावरून पतीने पत्नीच्या चेहऱ्य़ावर अ‍ॅसिड टाकून जखमी केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील बोपदेव घाटात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दिनेश शिरपत धुमक (वय 39, रा. बावधन) याला अटक केली आहे. पूनम धर्मेद्र जाधव ( वय 37) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

दीनेश आणि पूनम पती-पत्नी असून तो चारित्र्याच्या संशय घेऊन पूनमसोबत वाद घालत होता. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दिनेशने पत्नीला दुचाकीवर बसवून बोपदेव घाटात नेले. रस्त्यावर थांबवून पुन्हा चारित्र्यावर संशय घेऊन त्याने पत्नीसोबत वाद घातला. तू कोणत्या ठिकाणी काम करते, ते ठिकाण दाखव म्हणून वाद घातला. पत्नीने तिच्या कामाचे ठिकाण दाखविण्यास नकार दिला. त्यावेळी तू कशी काम करते तेच बघतोच. तुझ्या तोंडावरील मास्क खाली कर, मला तुझा चेहरा पहायचा आहे, असे म्हणाला. त्यामुळे पूनम यांनी तोंडावरील मास्क काढल्यानंतर दीनेशने लपवून आणलेली बाटलीतील अ‍ॅसिडसारखा ज्वलनशिल पदार्थ पूनमच्या चेहऱ्य़ावर व अंगावर टाकला. डोळ्याजवळ आणि दंडावर अ‍ॅसिड पडल्यामुळे ती जखमी झाली आहे.