
जन्माला आलेली मुलगी आपली नसल्याच्या संशयावरून बापानेच एक वर्षीय चिमुरडीचा गळा घोटून ठार मारले. 23 नोव्हेंबरला इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करेवाडी गावात हा प्रकार घडला.
पिला सकट्या काळे (वय 1 वर्षे) असे मयत चिमुरडीचे नाव आहे. याप्रकरणी सकट्या उर्फ चिंटू उर्फ शक्ती उर्फ शक्तिमान विकास काळे याला अटक करण्यात आली आहे. चिमुरडीची आई सोनम सकट्या काळे (वय 18) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे दांपत्य नगर जिल्ह्यातील आहेत. ऊस तोडणीच्या कामासाठी ते इंदापूर तालुक्यातील करेवाडी गावात आले होते. घटनेच्या दिवशी आरोपीने सोनमला ‘तू उस तोडलेल्या मोळ्या बांधायला का आली नाहीस’ असे विचारत तिच्यासोबत भांडण काढले. तसेच कोयता घेऊन तिच्या अंगावर धावून गेला.
त्यावेळी त्यांची एक वर्षाची मुलगी पिला ही कोपी मध्ये झोपलेली होती. पिलावरून पुन्हा सकट्या पत्नीशी वाद घालू लागला. ‘ही मुलगी माझी नाही आणि तिचा हुंडा देखील मी तुम्हाला मिळू देणार नाही. मीही खाणार नाही’ असे म्हणून त्याने स् मुलीचे नाक तोंड दाबून तिला ठार मारले.
त्यानंतर मुलीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिला मूळ गावी नेण्यात आले होते. गुरुवारी सोनमने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी नराधम बाप सकट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सारंगकर करीत आहेत.




























































