मौजमजेसाठी वाहनचोरी करणार्‍या सराईताला अटक, 7 दुचाकी, एक रिक्षा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मौजमजा करण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून वाहनचोरी करणार्‍या सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सात दुचाकी आणि एक रिक्षा अशी साडेचार लाखांवर किंमतीची वाहने जप्त करण्यात आली आहे. राजेश प्रकाश परळकर (वय 30 रा. सुखसागरनगर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

वाहनचोरी रोखण्याच्या अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एका रिक्षाचालकाचा संशय पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, राहुल तांबे, निलेश ढमढेरे यांना आला. पथकाने राजेश परळकर याला ताब्यात घेतले. त्याने ताब्यातील रिक्षा चोरीची असल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत त्याने भारती विद्यापीठ, सहकारनगर, हडपसर, जेजुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 7 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, एपीआय अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, अभिजीत जाधव, राहुल तांबे, निलेश ढमढेरे, सचिन सरपाले, शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, विक्रम सावंत, अशिष गायकवाड यांनी केली.

वाहन तपासणीवेळी रिक्षाचालकाचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले असता, त्याने रिक्षा चोरल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत त्याने 7 दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे.
श्रीहरी बहिरट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे