“कसब्यात माझा विजय झाल्यामुळे भाजपचे डोळे उघडले” रवींद्र धंगेकरांचे टीकास्त्र

महाविकास आघाडीचे पुण्याच्या कसबा पेठेतले आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपावर टीका केली आहे. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी धंगेकरांनी भाजपावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “कसबा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळी ताकद पणाला लवाली होती. त्यामुळे भाजपचाच विजय होईल असं त्यांना वाटलं होतं. मात्र भाजपचा कसबा पोटनिवडणुकीत पराभव झाला. माझ्या विजयामुळे आता भाजपचे डोळे उघडले आहेत. त्यामुळे आता भाजपचे नेते जनतेची कामे करताना दिसत आहेत.”

कसबा मतदारसंघातल्या लोकांनी मला निवडून दिलं आणि जनतेची सेवा करण्याची संधी दिली यासाठी मी त्यांचे आभार मानतो असे धंगेकर यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहरातल्या नागरिकांना मिळकत करात सवलत मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना आता यश आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी बैठक घेतली. त्यामध्ये शहरातील मिळकत करात 40 टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. यासाठी आम्हीही पाठपुरावा केला. पुणे ही आशिया खंडातली सर्वात जास्त टॅक्स घेणारी महापालिका आहे. आता 500 स्क्वेअर फूट घरांसाठी कर कमी करण्यात यावा ही मागणी आम्ही करणार असल्याचं धंगेकर म्हणाले.

पुणे शहरात जवळपास 10 लाख मिळकती आहेत. त्या सर्व मिळकतधारकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्याकडून महापालिका प्रशासन मिळकतकर वसुली करीत होती. त्यामुळे मिळकतकरात सवलत मिळाली पाहिजे अशी मागणी महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून आजपर्यंत मांडली. आज विधिमंडळात देखील मी हीच मागणी केली. त्या मागणीला यश आल्याचं रवींद्र धंगेकरांनी म्हटलं आहे.