
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सिल्व्हर ओक सोसायटीत आज पहाटे शिरलेल्या चोरट्यांनी 6 फ्लॅट फोडल्याची घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सिल्व्हर ओक सोसायटीच्या मागील बाजुस असलेले तारेचे कुंपण तोडून आज पहाटे चोरटे आवारात शिरले. त्यांनी सोसायटीतील 6 बंद सदनिकांचे कुलुप तोडून ऐवज लांबविला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर रहिवाशांनी घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना दिली. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील चित्रीकरण पडताळले असून चित्रीकरणात चोरट्यांनी चेहरा कापडाने झाकल्याचे आढळून आले आहे. सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरात रात्रपाळीत रखवालदार होता. चोरटे सोसायटीच्या मागील बाजुचे कुंपण तोडून आत शिरले. घरफोडी करून चोरटे मागील बाजूने पसार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

































































