पुणे – सिमेंटचा मिक्सर रुतल्याने केळकर रस्त्यावर वाहतूककोंडी

शहरातील मध्यवर्ती भागात पाईपलाईन खोदकामामुळे वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे. केळकर रस्त्यावर गुरुवारी वाळू सिमेंटचे मिश्रण करणारा अवजड ट्रक तीन फुटाहून अधिक खोल जमिनीत रुतल्याने परिसरतील वाहतूक ठप्प झाली. तब्बल सात तासांच्या प्रयत्नानंतर दुपारी दोनच्या सुमाराला दोन क्रेनच्या प्रयत्नाने ट्रक बाहेर काढण्यात आला.

पाईपलाईनच्या कामासाठी टिळक चौकापासून लक्ष्मी व कुमठेकर रस्त्यांवरील बहुतेक चौकात मागील महिनाभर खोदकाम सुरू आहे. जमिनीनंतर्गत पाईप लाईनच्या कामामुळे रस्त्याच्या बहुतांश भागात मोठे खड्डे पडले आहेत. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले. त्यामुळे मंगळवारपासून मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आली. मध्यवर्ती भागातील बहुतेक सर्व खोदलेले प्रमुख रस्ते, चौचौकात उभी असलेल्या अवजड क्रेन्स, पोकलेन मशीन, टिप्पर, मिक्सर्स , सगळीकडे पसरलेला राडारोडा आणि दोन दिवस झालेला मुसळधार पाऊसामुळे चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.

मध्यवस्तीतील निवासी व व्यापारी पेठांकडे जाण्यासाठीच्या केळकर आणि गोखले रस्त्याचा वापर करण्यात येतो. दरम्यान, गुरुवारी r सकाळी सातच्या सुमारास नारायण पेठेकडे चाललेल्या मिक्सरचे चाक पेठकर इमारतीजवळ रस्त्यात रुतले. त्यानंतर चालकाने वाहन बाहेर काढण्यासाठी बरीच खटपट केली. मात्र, रस्ता खचला असल्याने मिक्सरची सर्व चाके तीन फूट खाली रुतून बसली. त्यामुळे या भागातून चाललेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. दुपारी दोनच्या सुमाराला दोन बाजूनी दोन क्रेन लावण्यात आल्या. त्यानंतर संबंधित वाहन बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळित करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या