
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयातील किडनी रॅकेटप्रकरणी दोषींची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात पुण्यातील इनामदार हॉस्पिटल, ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलचा सहभाग असल्याचे समोर आले असून जर यात रुग्णालय प्रशासन दोषी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. तत्पूर्वी, या प्रकरणाचा अहवाल एका महिन्याच्या आत पूर्ण करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणप्रकरणी मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी आमदार भीमराव तापकीर, संग्राम थोपटे, मिहीर कोटेचा व अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील माहिती दिली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीही या प्रकरणाची सविस्तर माहिती सभागृहाला दिली. तानाजी सावंत म्हणाले की, याप्रकरणी पोलीस चौकशीत पुण्याचे इनामदार हॉस्पिटल, ठाण्याचे ज्युपिटर हॉस्पिटल या रुग्णालयांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणात वैद्यकीय शिक्षण व संशोधनाच्या संचालकांकडून महिन्याभरात चौकशी अहवाल मागू कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


























































