
पुण्यात कोथरूड परिसरातील नागरिकांमध्ये दहशत माजविणाऱ्या कुख्यात अविनाश कांबळे टोळीविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कांबळे टोळीविरूद्ध खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक शस्त्राव्दारे जखमी करणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, जबरी चोरी, घरफोडी, मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे अशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार केलेली ही 79 वी कारवाई आहे.
कोथरूड येथे राहणारे अविनाश राजेंद्र कांबळे (टोळीप्रमुख), रवी ज्ञानेश्वर बोत्रे, किरण ज्ञानेश्वर बोत्रे आणि भूगाव यथे राहणारा सुरज ऊर्फ सोन्या राम कुडले अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या आरोपींविरूद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यामुळे या टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाईसाठी वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यावतीने अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, एसीपी रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक, बाळासाहेब बडे, पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड, भास्कर बुचडे, अजय सावंत, अनिल बारड यांनी केली.

























































