
जंगलातून वाट चुकून पुणे शहरातील कोथरूड परिसरात आलेल्या रानगव्याचा अखेर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली . नागरिकांनी केलेली हुल्लडबाजी, आरडाओरड, गर्दी, गोंगाट यामुळे हा वन्यजीव माणसांच्या वस्तीत गोंधळला. सैरभैर पळू लागला त्यातच गंभीर जखमी झाला. वन्यविभाग, वन्यप्रेमी, पोलीस, अग्निशमक दल आणि महापालिकेच्या कर्मचाऱयांनी धावपळ करून गव्याला रेस्क्यू केले. भुलीचे इंजेक्शन देऊन काबूत आणले. मात्र, काही वेळानंतर गव्याने प्राण सोडले.

बुधवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास रानगव्याचा थरार सुरू झाला. कोथरूडमधील महात्मा सोसायटीच्या गल्ली क्रमांक एकमध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना रानटी गवा दिसला. सुरुवातीला नागरिकांना ही एखादी गाय असावी अथवा म्हैस असावी असे वाटले. त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले, पण काही काळाने रानटी गवा असल्याचे लक्षात येताच नागरिकांची तारांबळ उडाली. गव्याला पाहण्यासाठी परिसरातील स्थानिक नागरिकांनी तोबा गर्दी केली आहे. नागरिकांच्या गोंधळामुळे गव्याने काही फूट उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून मोकळ्या जागेमध्ये पळ काढला. गव्याने परिसरातील घराचे एक गेटदेखील धडक देऊन तोडले आहे.

रस्त्यावर पडला रक्ताचा सडा
नागरिकांच्या गोंगाटामुळे रानगवा बिथरला होता. त्यामुळे त्याने काही ठिकाणी धडक दिल्याने तो जखमी झाला. तशा अवस्थेत तो सैरभर पळत राहिला. महात्मा सोसाटीतून उजव्या भुसारी कॉलनीतील इंदिरा-शंकर सोसायटीत गेला. सोसायटीच्या पार्किंगजवळ गवा काहीवेळ बसून राहिला होता. त्यामुळे परिसरात रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले.
व्हिडीओ काढण्यासाठी तोबा गर्दी
वनखात्याच्या कर्मचाऱयांनी रानगव्याचा पाठलाग करून त्याच्या गळ्यात मोठा दोर टाकला. मात्र, तरीही त्याला पकडणे शक्य झाले नाही. गळ्यात दोर टाकल्यानंतरही गवा सैरभर पळत होता. रानगव्याचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे गवा आणखीनच भांबावल्यामुळे पळत सुटला.

































































