पुण्यात मूकबधिरांवर अमानुष लाठीहल्ला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पुणे

शिक्षण आणि नोकरीच्या वेळी येणाऱया अडचणी सोडवा, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून द्या यासह विविध प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी समाजकल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱया मूक आणि कर्णबधिर तरुण-तरुणींचा ‘आवाज’ पुणे पोलिसांनी ‘ऐकले’च नाही. उलट पोलिसांनी आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत मुकबधिरांवर अमानुष लाठीहल्ला केला. लाठीहल्ल्याला विरोध करण्यासाठी त्यांच्याकडे ‘शब्द’ नव्हते. सैरभैर झालेले हे आंदोलक वेदनेने विव्हळत होते.

दरम्यान, लाठीहल्ल्यामुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मूकबधिर आंदोलकांमध्ये घबराट पसरली आहे. या लाठीहल्ल्यात काही आंदोलक जखमी झाले असून, उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापुढेही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या तरुण-तरुणींनी केला आहे. विविध मागण्यांसाठी कर्णबधिर आणि मूकबधिर राज्यस्तरीय संघटनेकडून सोमवारी राज्याच्या समाजकल्याण आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनात राज्यभरातून आलेले तीन ते चार हजार मूकबधिर तरुण-तरुणी सहभागी झाले आहेत.

लाठीहल्ल्याची चौकशी करा – डॉ. नीलम गोऱहे

आंदोलन करणाऱया मूकबधिर युवकांवर पुणे पोलिसांनी लाठीहल्ला केल्याची माहिती मिळताच शिवसेना उपनेत्या, आमदार डॉ. नीलम गोऱहे यांनी तातडीने दखल घेऊन जिल्हाधिकाऱयांकडे विचारणा केली. या लाठीहल्ल्यामध्ये जखमी आंदोलनकर्त्यांवर तातडीने उपचार करण्यात यावेत व लाठीहल्ल्याची चौकशी करून जबाबदार अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. मूकबधिरांच्या मागण्यांवर सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.