
पुण्याच्या कर्वेनगरमध्ये राहणारी राधिका सोनवणे हिच्या गॅलरीत, किचनच्या बाल्कनीत दररोज 30 ते 40 पोपटांचा थवा येतो. राधिकाच्या हातचं खाणं खातात आणि भुर्रकन उडून जातात. जणू तिची पोपटांशी गट्टी जमली आहे. त्यांच्यामुळे अख्खा लॉकडाऊन आनंदी गेल्याचे राधिका सांगते.
राधिका सोनवणे म्युच्युअल फंड असिस्टंट मॅनेजर आहे. लॉकडाऊनमध्ये तिचे वर्क फ्रॉम होम सुरू होते. तिला लहानपणापासून पक्ष्यांची आवड आहे. ही आवड जोपासण्यास तिला लॉकडाऊनमध्ये वेळ मिळाला. तिच्या घराच्या बाल्कनीत पोपट, खारूताई, बुलबुल, चिमणी असे पक्षी येतात. राधिका सांगते, लॉकडाऊनपूर्वी एक-दोन पोपट बाल्कनीत येत होते. रोज सकाळी साडेसहा ते साडेसात वाजेपर्यंत पोपटांचे येणं असते. त्यांची येण्याची वेळ मी लक्षात ठेवली आणि त्यांच्यासाठी दाणे, फळे, पाणी बाल्कनीत ठेवायला सुरुवात केली. बाल्कनीसमोर भरपूर झाडी असल्याने हळूहळू पोपटांची संख्या वाढत गेली. मला पक्षी निरीक्षण घरबसल्या अनुभवता आले. पक्ष्यांचे प्रकार, त्यांच्या सवयी मला समजू लागल्या आहेत. हा आयुष्यभराचा अनुभव मिळाला आहे.




























































