
दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूळ बाळगणाऱ्या सराईताला सिंहगड पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन जिंवत काडतुसे असा 40 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
बापू उर्फ परशुराम अरूण जानराव (वय 41, रा. अपर, बिबवेवाडी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यातंर्गत विविध प्रकाराचे 10 गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना सराईत गुन्हेगार पुणे सातारा रस्त्यावरील एका बागेसमोर पिस्तूल बाळगून उभा असल्याची माहिती पोलीस हवालदार कुंदन शिंदे व विष्णू सुतार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बापू उर्फ परशुरामला ताब्यात घेतले.
अंगझडतीत त्याच्याकडे एक पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने पिस्तूल मेव्हण्याकडून घेतल्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्षक विजय खोमणे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, महेश गाढवे, राहूल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, अमित सुर्वे, विष्णू सुतार, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, सागर सुतकर, शरद राउत यांच्या पथकाने केली.

























































