
सहकाऱ्याने झालेल्या भांडणातबाबत विचारणा केल्याने तरूणाने कमरेच्या बेल्टने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील ट्रान्सपोर्टनगर – निगडी येथे घडली. खूनप्रकरणी पोलिसांनी तरूणाला गजाआड केले आहे.
तानाजी आप्पाराव कमचले (वय 55,रा. मोरे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अभिजित मथू गुंजाळ (वय 26, रा. यमुनानगर, निगडी) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. रमेश रघुनाथ बगाटे (वय 48, सध्या रा. ट्रान्सपोर्टनगर, निगडी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बगाटे व तानाजी हे ट्रान्सपोर्टनगरीत बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांसाठी गाईडचे काम करतात. 5 नोव्हेंबर रोजी गुंजाळ व फिर्याद बगाटे यांच्यात वाद झाला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास बगाटे व तानाजी हे ट्रान्सपोर्टनगर येथील पीसीएमसी इमारतीत झोपले होते. त्या वेळी तिथे आलेल्या आरोपी गुंजाळ याला तानाजी यांनी बगाटे यांच्यासोबत झालेल्या वादाबाबत विचारणा केली. त्यावरून गुंजाळ याने तानाजी व बगाटे यांना कमरेच्या बेल्टने मारहाण केली. यात तानाजी गंभीर जखमी झाले. रूग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. फौजदार आहेर तपास करीत आहेत.

























































