
किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर मित्राने रागाच्या भरात तरुणावर चाकूने वार करुन त्याचा खून केल्याची घटना लष्कर परिसरात घडली आहे. उबेद बाबू कुरेशी (वय28 , रा. भीमपूरा कॅम्प ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याप्रकरणी पोलिसांनी नबील शब्बीर बेलीम याला ताब्यात घेतले आहे.
उबेद आणि नबील मित्र असून दोघेही बाबजान चौकात बसले होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे वादाचे रूपांतर बाचाबाचीत झाल्याने नबीलने उबेदवर चाकूने सपासप वार केले. यात तो गंभीर जखमी झाला होता. भरवर्दळीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती लष्कर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने नबीदला रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास लष्कर पोलीस करत आहेत.




























































