
मी स्टॉलवर एमबीएचा अभ्यास करायचे. अंडाभुर्जी खायला येणारे ग्राहक माझे काैतुक करायचे. अभ्यास सुरू ठेव, असं सांगायचे. त्यांच्यामुळे एमबीए पूर्ण करायची प्रेरणा मिळाली. आज आमच्या प्रत्येक सेंटरवर दिवसाला 300 अंडी संपतात. ग्राहकांची ही कृपा आहे, असे रुपाली जाधव हिने दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.
एमबीए शिकून एखाद्या बडय़ा कंपनीत नोकरी करण्यापेक्षा मामाच्या अंडाभुर्जी गाडीचा व्यवसाय वाढवून अंडाभुर्जीची क्वीन ठरलेल्या पुण्याच्या रुपाली जाधव हिचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. रुपालीने आपल्या शिक्षणाचा उपयोग करून पुण्यात स्वतःची तीन अंडाभुर्जी सेंटर सुरू केली आहेत.
रुपालीचे मामा पुण्यात अंडाभुर्जीची गाडी चालवायचे. 2008 सालापासून रुपाली त्यांना कामात मदत करायची. या व्यवसायाचे धडे तिने मामाकडून गिरवले. पुढे 2013 साली मामाचे निधन झाल्यावर अंडाभुर्जीची गाडी ती स्वत: चालवू लागली. तिच्या आईची आणि आजीआजोबांची तिला मदत होतीच. हा व्यवसाय करतानाच रुपालीने एमबीएपर्यंतचा पल्ला गाठला. अंडाभुर्जी गाडीवरचं काम सांभाळून तिने एमबीए पदवी मिळवली. अनुभवाला शिक्षणाची जोड मिळाली आणि मग काय… रुपालीने व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केले. डेक्कन काॅर्नर येथे शिवमल्हार अंडाभुर्जी सेंटर सुरू झालं. साधी भुर्जी असू दे किंवा बॉईल वा कच्ची भुर्जी किंवा अंडा राईस…खास मसाले, खास चव… यामुळे या सेंटरची ख्याती पसरली. दूरवरून लोक ही भुर्जी खायला येऊ लागले. त्यानंतर रुपालीने सेंट्रल मॉलजवळ आणि कर्वेनगर येथे उभी केली. आता तर रुपालीकडे फ्रेंचायझीसाठी विचारणा होत आहे. मुंबईतूनही फेंचायझीसाठी विचारणा झाल्याचे रुपालीने सांगितले. त्यामुळे येत्या काळात शिवमल्हार अंडाभुर्जी लज्जत मुंबईत चाखायला मिळाली तर आश्चर्य नको.

































































