
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी संध्याकाळी 6च्या सुमारास प्रोपलेन गॅस वाहून नेणारा टँकर उलटल्याने वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला होता. वाहनचालक व प्रवाशांना तळमळत रात्रही गाडीतच काढावी लागली. अखेर मोठय़ा प्रयत्नाने ज्वलनशील असलेला टँकर हलवण्यात यश आल्याने मध्यरात्री दोननंतर वाहतूक सुरू झाली आणि एक्सप्रेस वेने तब्बल 32 तासांनंतर मोकळा श्वास घेतला. एक्सप्रेस वेच्या इतिहासातील अशा प्रकारची वाहतूक कोंडी ही पहिलीच असून ‘त्या’ आठवणीच्या धक्क्यातून प्रवाशी अजूनही सावरलेले नाहीत.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अनेकदा प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते. मात्र या वाहतूक काsंडीनंतर एक्सप्रेस वेवरील प्रवास नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. प्रोपलेन गॅस वाहून नेणारा टँकर उलटल्यानंतर संपूर्ण मार्ग ठप्प होऊन 30 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
आडोशी बोगद्याजवळील प्रोपलेन गॅसचा टँकर हटवणे हे मोठे आव्हान होते. हा गॅस अत्यंत घातक असल्याने दोन्ही लेनवरील वाहतूक बंद करावी लागली.
– स्थानिक पोलीस, हेल्प फाऊंडेशन, अग्निशमन दल एनडीआरएफ, रिलायन्स प्रशासन, महामार्ग व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध यंत्रणांची पथके तब्बल दोन दिवस वाहतूक काsंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करीत होती.
एक्सप्रेस वेवरून रोजच स्पह्टक, ज्वलनशील गॅस टँकर व केमिकलची वाहतूक करणारे टँकर यांची ये-जा सुरू असते. मात्र त्याची तपासणी करणारी यंत्रणा नसल्याने एमएसआरडीसी व आयआरबीचा ढिसाळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे.
…आणि ‘ऑपरेशन टँकर’ यशस्वी झाले
कोचीहून गुजरातकडे जाणारा 21 टन वजनाचा प्रोपलेन गॅस टँकर आडोशी बोगद्याजवळच्या तीव्र उतारावर पलटी झाला. टँकरचे दोन्ही व्हॉल्व्ह ब्रेक झाल्याने मोठय़ा प्रमाणावर गळती सुरू झाली. ही गळती थांबवण्यासाठी सर्व प्रकासच्या एक्सपर्ट टीम दाखल झाल्या. पण त्यातील गॅस बाहेर काढणे हे अतिशय कठीण काम होते. कारण थोडी जरी चूक झाली असती तर आजूबाजूचा पाच ते सहा किलोमीटरचा परिसर बेचिराख झाला असता. त्या टँकरमधील गॅस बाहेर काढून तो अन्य तीन ते चार टँकरमध्ये भरण्याचे काम सुरू झाले तेव्हा सर्व कामगारांनी अक्षरशः देवाचा दावा केला. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. ही कामगिरी फत्ते होताच टीमने सुटकेचा निश्वास सोडला. या संपूर्ण प्रक्रियेला पाच ते सात तास लागले. अतिरिक्त महासंचालक प्रवीण साळुंखे, रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी टीमचे मनोधैर्य वाढवले. टँकर हटवण्याचे मिशन यशस्वी झाल्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक पूर्ववत झाली.



























































