
>> नवनाथ शिंदे
नववर्षांच्या पार्श्वभूमीवर हॉटेलसह पबमधील आयोजित पार्ट्यांवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकांकडून विशेष वॉच ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेषतः अमली पदार्थ विक्रेत्या तस्करांसह नशेली पदार्थांची होणारी खरेदी-विक्री रोखण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत सराईत अमली पदार्थ विक्रेते, परदेशी अमली पदार्थ तस्कर, मध्यस्थी विक्रेत्यांची कुंडली तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले आहे. 30 डिसेंबरपासून दोन्ही पथकांकडून कारवाईसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याशिवाय स्थानिक पोलिसांकडूनही कारवाईसाठी मदत केली जाणार आहे.
महाविद्यालयीन तरूण-तरूणींसह अमली पदार्थांचे सेवन करणार्यांची संख्या पुण्यात मोठी आहे. त्याअनुषंगाने नववर्षांच्या पार्श्वभूमीवर तस्करांकडून विविध भागात नशेली पदार्थांची विक्री केली जाते. विशेषतः उपनगरांसह दूरवरील हॉटेल्स, पब आणि खासगी पार्ट्यांमध्ये गांजा, कोकेन, एमडी, अफीम यासारख्या अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. अवघ्या एक ते दोन दिवसांत तस्करांकडून कोट्यावधींचे अमली पदार्थ विकले जातात. त्यामुळे तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकांनी कारवाईची व्यूहरचना आखली आहे. मध्यवर्ती शहरासह उपनगरामध्ये वास्त्यव्याला असलेल्या आणि गुन्हे दाखल असलेल्या नायझेरियन, युगांडा, आफ्रिकन नागरिकांचा डेटा संकलित करण्यात आला आहे. त्यामध्ये अमली पदार्थ विक्रीच्या प्रयत्नात कारवाई झालेल्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याविरूद्ध कोणकोणत्या कारवाया झाल्या आहेत, अमली तस्करांसोबत सध्याचे कनेक्शन, वर्षभरातील अॅक्टिव्हिटी धुंडाळण्यात येणार आहे. त्यासाठी पथकांकडून पेट्रोलिंगवर भर देण्यात आला आहे.
शहरात मागील 15 दिवसांत अमली पदार्थ विरोधी पथकांनी कोकेन, मेफेड्रॉन, गांजा तस्करांची झाडाझडती घेउन जवळपास अडीच कोटींवर नशेली पदार्थ जप्त केले आहे. त्यामध्ये कोकेनचा सर्वाधिक समावेश असून कारवाईमुळे ऐन नववर्षांच्या तोंडावर तस्करांना मोठा तडाखा दिला आहे. संबंधित जप्त करण्यात आलेले सर्व नशेली पदार्थ नववर्षांच्या पार्ट्यांमध्ये विक्री केले जाणार असल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित तस्करांकडून आणखी कोठे अमली पदार्थांची विक्री करण्यात येणार आहे, त्याबाबची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार अमली पदार्थ विक्रेत्या तस्करांचे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी गुन्हे शाखेने मोहिम हाती घेतली आहे. दरम्यान, आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींमध्ये नायझेयिन तस्कारांचा मोठा सहभाग असल्याचेही दिसून आले आहे. त्याद्वारे संबंधितांची साखळी मोडीत काढण्याचे आव्हान दोन्ही अमली पदार्थ विरोधी पथकांपुढे असून कारवाईसह पेट्रोलिंगवर भर देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, एपीआय लक्ष्मण ढेंगळे, एपीआय शैलेजा जानकर यांच्या पथकाकडून अमली पदार्थ विक्रेत्यांसह तस्करांविरूद्ध कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे.
उंड्री, पिसोळी कोंढवा परिसरात झाडाझडती
व्यवसाय, नोकरी आणि शिक्षणाच्या नावाखाली अनेक नायझेरियन पुण्यातील उंड्री, पिसोळी, कोंढव्यात वास्तव्याला आहेत. मात्र, उद्देश सोडून अनेकांकडून एकमेकांच्या साथसंगतीने अमली पदार्थ तस्करीची वाट धरली जाते. कमी वेळेत जास्त पैसे मिळत असल्यामुळे बहुतांश नायझेरियन तस्करीत कार्यरत आहेत. वेळोवेळी कारवाई होउनही कारागृहाबाहेर आल्यानंतरही त्यांनी पुन्हा पुन्हा अमली पदार्थ तस्करीचा मार्ग सोडलाच नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकांनी उपनगरातील उंड्री, पिसोळी, कोंढवा, विमाननगर, हडपसर परिसरात झाडाझडती सुरू केली आहे. त्याद्वारे संबंधितांची लिंक घेउन कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे .
पुणे पोलिसांचे आवाहन
नववर्षांसाठी अनेक हॉटेल व्यावसायिकांसह पब मालकांकडून पार्ट्यांचे आयोजन केले आहे. त्यासाठी पार्ट्यांमध्ये काही तरूण-तरूणींच्या मागण्यांमुळे तस्करांकडून अमली पदार्थांची विक्री होउ शकते. त्यापार्श्वभूमीवर संबंधित मालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. पार्ट्यांमध्ये संशयास्पदरित्या सहभागी झालेल्यांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी. त्याशिवाय, पार्ट्यांमध्ये नशेली पदार्थांची खरेदी विक्री होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. अन्यथा तस्करांसह संबंधित आस्थापनाविरूद्धही कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.
























































