सेक्स रॅकेटमध्ये अडकविण्याच्या धमकीने तरुण-तरुणीकडून उकळले 10 हजार; वाघोली पोलीस ठाण्यातील तिघे तडकाफडकी निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयटी अडकविण्याची धमकी देऊन पोलिसांनी त्यांच्याकडून फोन पेद्वारे पैसे उकळल्याची घटना वाघोली परिसरात घडली. हा प्रकार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर पडताच, त्यांनी तत्काळ वाघोली पोलीस ठाण्यातील तिघा पोलिसांचे निलंबन केले. हवालदार किरण अब्दागिरे, शिपाई गणेश खाडे, किरण कांबळे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत. उपायुक्त सोमय मुंडे यांनी निलंबनाचे आदेश दिले.

२ एप्रिलला खाडे आणि कांबळे हे दोघे वाघोली गावठाण बिट मार्शल म्हणून कर्तव्यावर होते. रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास त्यांना नियंत्रण कक्षाकडून वाघोलीतील सोसायटीत काही मुले रूमवर मुली आणून व्हीडिओ तयार करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खाडे आणि कांबळे तेथे गेले. तेथील २४ वर्षीय तरुणाला व तिच्या मैत्रिणीला घेऊन हे दोघे पोलीस ठाण्यात गेले. त्या रात्री अंमलदार म्हणून अब्दागिरे हे कर्तव्यावर होते. अब्दागिरेने तरुण-तरुणीला तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सेक्स रॅकेटमध्ये अडकवितो, नोकरी घालवितो, नातेवाईकांना बोलावून घेतो अशा धमक्या दिल्या.

खाडेने तरुणाला चापटा मारल्या. कांबळेने तरुणाच्या मैत्रिणीला पोलीस गाण्यात ताटकळत उभे ठेवले. हा प्रकार मिटवून घेण्यासाठी तिघांनी तरुणाकडे १० हजार रुपयांची मागणी केली. खाडेने त्याच्या मोबाईलमध्ये असलेला स्कॅनर तरुणाला दाखविला. तो ओंकार अॅटो गॅरेज नावाने होता. त्यावर फोन पेद्वारे १० हजार रुपये घेतले. त्यानंतर दोघा आयटी अभियंता तरुण-तरुणीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे धाव घेत तक्रार केली.