अजितदादा निधीवाटपात भेदभाव करणार नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाठराखण

आम्हाला मतदान न केल्यास निधी मिळणार नाही असे वक्तव्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाठराखण केली. अजितदादा बोलले तरी त्यांचा तसा उद्देश नाही, ते निधीवाटपात भेदभाव करणार नाहीत, अशी सारवासारव फडणवीस यांनी केली.

माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारावेळी बोलताना अजित पवार यांनी आमचे 18 उमेदवार निवडून द्या, तुम्ही सांगाल ते करेन, पण काट मारलीत तर मीही काट मारीन, तुमच्या हातात मताचा अधिकार आहे तसा माझ्याकडे निधीचा आहे, असा इशारा मतदारांना दिला होता. त्यावरून त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका झाली.

मुख्यमंत्री फडणवीस यांना यासंदर्भात आज प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्यांनी अजित पवारांची बाजू उचलून धरण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीनंतर सर्वच शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे, संपूर्ण राज्याचा विकास आम्हाला करायचा आहे, असे ते म्हणाले.

निवडणुकीत असं बोलायचं असतं – अजित पवार

अजित पवार यांनीही माळेगावमधील आपल्या वक्तव्यावर आज प्रतिक्रिया दिली. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी आम्हाला निवडून दिल्यास जास्तीत जास्त निधी देऊ असे विधान केले होते, निवडणुकीत असं बोलायचं असतं, असे अजित पवार म्हणाले.