
मी कारखाना घेतला तेव्हा शिखर बँकेवर राजकीय नेते नव्हते. ईडीने ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता त्या 97 पैकी बहुतांश नेते हे आज मिंधे गटासोबत, भाजपसोबत आणि अजित पवार गटासोबत आहेत. त्यातील लोकांवर कोणतीही कारवाई होत नाही, मात्र माझ्याविरोधात आता ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. पळून जाणारे गेले, पण मी विचारांसोबत आणि जनतेसोबत असून मी न्यायालयीन लढाई लढणार अन् जिंकणार, असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
कन्नड साखर कारखाना खरेदी प्रकरणावर ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर रोहीत पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली. कन्नड साखर कारखान्याच्या जमिनीचा जितका आकडा सांगितला जात आहे तितकी नक्कीच महाग नाही, पण माझ्यावर मुद्दाम आरोप केले जात आहेत. आता आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागले. सेशन्स कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही ही लढाई लढू आणि विजय आमचाच होईल. कारण आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही.