Pune news – भाजपचे माजी मंत्री दिलीप कांबळे यांची काँग्रेस उमेदवाराला जाहीर सभेत शिवीगाळ!

पुणे महापालिका निवडणुकीचे राजकारण आता तापले असून सत्तेसाठी हपापलेले नेते प्रचाराच्या मैदानात उतरत असताना शब्दांची पातळी थेट शिवीगाळ करेपर्यंत घसरल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्यावर जाहीर सभेत अत्यंत खालच्या पातळीवर टीका करत शिवराळ भाषा वापरल्याने खळबळ उडाली आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून पराभव दिसताच भाजपची तंतरली असल्याचे बोलले जात आहे.

वानवडी–साळुंखे विहार प्रभागातून काँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेले प्रशांत जगताप हे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले. या मुद्द्यावरून भाजपचे माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी जाहीर सभेत जगताप यांच्यावर सडकून टीका केली. टीका करताना आपण काय बोलतोय, याचे भानही कांबळे यांना राहिले नाही.

“शरद पवारांचे फोटो कार्यालयभर लावणारा माणूस एका दिवसात ते काढतो, ही कसली निष्ठा?” असे म्हणत त्यांनी थेट घाणेरडी भाषा आणि कुणालाही सहन न होणारी शिवीगाळ केली. याहून धक्कादायक बाब म्हणजे सभेत उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी या शिवीगाळीवर टाळ्या व शिट्ट्या वाजवल्या. या प्रकाराचा सर्वत्र निषेध होत आहे.

याबाबत काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी तीव्र निषेध केला असून मतदारांना भाजपला मतदानाने देण्याचे आवाहन केले आहे. भाजपचा पराभव समोर दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सैरभैर झालेल्या भाजपच्या माजी मंत्र्यांनी मला जाहीर सभेत अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. वानवडी–साळुंखे विहारच्या नागरिकांनो, ही भाजपची घाणेरडी संस्कृती आपल्याला मान्य आहे का? अशी अश्लील प्रवृत्ती आपल्या प्रभागात नको. या शिवीगाळीला मतदानातून चोख प्रत्युत्तर द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.