
पाच दिवसांपूर्वी हैदराबादहून मित्रांसोबत सिंहगडावर फिरायला आलेला गौतम गायकवाड हा तरुण बेपत्ता झाला होता. तानाजी कडा येथून गौतम खोल दरीत पडला असावा, अशी भीती त्याच्या मित्रांनी व्यक्त केली होती. मित्रांच्या माहितीवरून गेले पाच दिवस एनडीआरएफ, अग्नीशमन दल, वन विभाग, पोलीस गौतमचा दरीत शोध घेत होते. मात्र गौतमचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. यामुळे गौतम अचानक बेपत्ता झाल्याने रहस्य निर्माण झाले होते. अखेर पाच दिवसांच्या शोधमोहिमेनंतर गौतम किल्ल्यावरच जिवंत सापडला आहे.
गौतम किल्ल्यावरच आजारी अवस्थेत आढळून आला. त्याच्या शरीरावर जखमा होत्या. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गौतम चार दिवस कुठे याबाबत अद्याप उलगडा झाला नाही. सध्या गौतमची प्रकृती स्थिर नाही, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गौतमला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पोलीस त्याचा जबाब नोदवणार आहेत.
गौतमचा फळांचा व्यवसाय असून त्याच्यावर मोठं कर्ज असल्याची माहिती मिळते. यातून त्याने बेपत्ता असल्याचा बनाव रचला का? गौतमच्या गायब होण्यामागे त्याच्या मित्रांचा सहभाग होता का? याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. गौतमची चौकशी केल्यानंतरच सत्य काय आहे याचा उलगडा होईल.