आता वाढतोय चिकुनगुणियाचा धोका

कोरोनानंतर सुरू झालेल्या विविध आजारांचे दुष्टचक्र अद्यापि सुरू आहे. म्युकर मायसोसिस, डेंग्यू, झिकापाठोपाठ आता चिकुनगुणियाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, सर्व रुग्णालये रुग्णांच्या गर्दीने फुल्ल झाली आहेत.

पुणे शहर तसेच लगतच्या उपनगरांमध्ये विशेषतः मुंढवा, धनकवडी, सिंहगड रस्ता परिसराबरोबरच आळंदी, चाकण आणि वाघोली संसर्गजन्य आजारांपेक्षा चिकुनगुणियाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत आहे.

ताप येऊन गेल्यानंतर सांधे दुखणे हा त्रास उद्भवू लागलेला आहे. त्यामध्ये दोन प्रकार असण्याची शक्यता असते. एक वायरल अल्तराल्जिया म्हणजे वायरल इन्फेक्शन होऊन गेल्यानंतरची सांधेदुखी जी 6 आठवड्यापर्यंत राहू शकते, असा अनुभव आहे. चिकुनगुणियामुळे येणारा ताप तीन ते सात दिवस राहतो आणि त्यानंतर अंगावर रॅश येते किंवा तोंड येते; परंतु बऱ्याचजणांना सांधेदुखीचा त्रास होतो.

चिकुनगुणियाचा व्हायरस हा नवीन म्युटेड व्हायरस असण्याची शक्यता वैद्यकीयतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याचे पसरण्याचे प्रमाणही वाढले आहे. सकाळी आणि संध्याकाळी गरम पाण्याने स्नान केल्यास सांधेदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते. एसीमध्ये जास्तीत जास्त जाणे टाळावे. एकाजागी खूप वेळ बसण्याचे काम असल्यास मध्ये मध्ये उठून हालचाल केल्यास सांधेदुखी कमी होते. सांधेदुखी असल्यास लोक पेनकिलर घेतात. मात्र, त्याचा वापर कमीत कमी करावा. त्याची सवय लागू नये आणि त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत. ज्या लोकांना पेन किलर घेतल्याने पित्त, उलटी आणि पोटदुखी असा त्रास होतो, त्यांनी शक्यतो डॉक्टरी सल्ल्याशिवाय कुठलीही गोळी खाऊ नये, असे डॉ. नितीन बोरा यांनी नमूद केले.

आळंदी, चाकण, वाघोली, मुंढवा, धनकवडी, सिंहगड रोड आणि रास्ता पेठ, चिकुनगुणियाच्या वाढीमुळे आयसीयू आणि वॉर्ड भरले आहेत. वाकड आणि चाकणसारख्या भागांसह संपूर्ण पुण्यात संसर्ग पसरला आहे. वेदना आणि पुरळ चिकुनगुणियाचे सूचक आहेत. या प्रकोपामुळे गॅस्ट्रोएन्टेरिटिस आणि उलट्या यांसारखी नवीन लक्षणे दिसून आली. चिकुनगुणियामुळे नेहमीच्या सांधेदुखीच्या पलीकडे गंभीर गुंतागुंत निर्माण होत आहे. डेंग्यू आणि इतर संक्रमणांच्या तुलनेत चिकुणगुनिया रुग्णांची संख्या जास्त आहे.