Pune News – वॉटरपार्कचा उत्साह एका क्षणात मावळला; मणक्याचे झाले चार तुकडे, महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे जिल्ह्यातील मोराची चिंचोली येथील ‘जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात’ व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे एक भीषण दुर्घटना घडली आहे. सहलीसाठी आलेल्या अश्विनी संदीप नप्ते (वय 37) या महिला पर्यटकाचा वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी कमी असल्याने अपघात झाला, ज्यात त्यांच्या पाठीचे मणक्याचे चार तुकडे झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाले असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी संदीप नप्ते या आपल्या कुटुंबासह वॉटरपार्कमध्ये गेल्या होत्या. मात्र, वॉटरपार्कमध्ये एका स्लाइडवरून घसरताना त्या पाण्यामध्ये जोरात आपटल्या आणि जागीच बेशुद्ध पडल्या. त्या ज्या ठिकाणी पडल्या त्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी होती. या घटनेवेळी पर्यटन केंद्रात कोणतीही तातडीची वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अश्विनी यांना रुग्णालयात पोहोचवण्यास विलंब झाला, ज्यामुळे त्यांची प्रकृती अधिक खालावली. याप्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात पर्यटन केंद्राचे मालक आणि व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यटकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा असुरक्षित वॉटरपार्कवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

ST Bus Price Hike – उन्हाळी सुट्टीचा बेत आखताय? एसटी महामंडळाचं भाडेवाढीचं सरप्राईज