
ओएलएक्स अॅपवर बनावट प्रोफाईल उघडून नागरिकांकडून महागडे कॅमेरे भाड्याने घेऊन फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून आतापर्यंत 7 लाख 35 हजार रुपये किंमतीचे 8 कॅमेरे जप्त करण्यात आले आहेत. संग्राम गणेश मांढरे (वय 19, रा. नागोबा आळी, भोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरातील एका व्यक्तीने झुबेर अब्दुल मजीद गाझी व आनंद डिकोळे यांना त्यांच्याकडील कॅमेरे ओएलएक्सवर भाड्याने लावून देतो, असे आमिष दाखविले. त्यांना कात्रज चौकात बोलवून त्यांचे साडेतीन लाख रुपये किंमतीचे कॅमेरे घेऊन गेला. त्यानंतर त्यांना कॅमेरेही मिळाले नाही. त्या व्यक्तीशी संपर्क झाला नाही. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कॅमेरे घेऊन जाणारा हर्षल थोपटे किनारा हॉटेलजवळ थांबला असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने संग्राम मांढरे नाव सांगितले. त्याच्याकडे शुटिंगचे महागडे 8 कॅमेरे आढळून आले. त्यामुळे त्याने आणखी काही व्यक्तींना फसविल्याची शक्यता पोलिसानी वर्तविली आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असून ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशी करत होता फसवणूक
आरोपी संग्रामने ओएलएक्सवर एक बनावट प्रोफाईल उघडले होते. त्यानुसार तो नागरिकांना शूटिंगचे कॅमेरे भाड्याने लावून दिले जातील. त्या बदल्यात महिन्याला पैसे मिळतील, असे आमिष दाखवले जात होते. नागरिकही त्याच्या आमिषाला बळी पडून त्याच्याकडे कॅमेरे देत असता. कॅमेरे देते होते. त्यावेळी संग्राम त्यांना थोडीशी रक्कम देऊन बनावट आधारकार्ड त्यांना देत होता. कॅमेरा मिळाल्यानंतर तो प्रोफाईल बंद करून कॅमेरे विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.





























































