पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन, ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

crime

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करून महानगरपालिकेसमोर आंदोलन केल्याप्रकरणी ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मास्क न लावणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, कोणतीही परवानगी न घेता महासंघाने काल आंदोलन केले होते. आनंद कन्हैयालाल दवे (वय 47, रा. गुरुवार पेठ), निलेश श्रीकांत जोशी (वय 39, रा. आनंदनगर, वडगाव), मनोज सदाशिव तारे (वय 44, रा. कळस), तुषार नंदकुमार निंबर्गी (वय 28, रा. शिवणे), सौरभ मनोहर वैद्य (वय 26, रा. मांजरी), दिलीप सुरेश तांबेकर (वय 52, रा. कोथरुड), संतोष मनोहर वैद्य (वय 42) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी दिनेश वीर यांनी फिर्याद दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशविसर्जनसाठी महापालिकेच्यावतीने नवीन कंटेनरची सोय केली आहे. मात्र हे कचऱ्याचे कंटेनर असून भावना दुखविल्याचा दावा करत ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी महापालिकेसमोर आंदोलन केले होते. त्यांनी महापालिकेचे फोटो असलेले फलक पाण्याच्या बादलित बुडवित निषेध केला. आंदोलनादरम्यान त्यांनी सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्कचा वापर केला नाही. त्यामुळे संबंधितांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सर्वाची जामिनावर सुटका करण्यात आली.

महानगरपालिकेसमोर आंदोलन करताना ब्राम्हण महासंघाने पूर्व परवानगी घेतली नाही. सहपोलीस आयुक्तांच्या आदेशाचा भंग करुन तोंडाला मास्क न लावता कोवीड 19 साथ रोगाचा संसर्ग होईल, असे कृत्य करुन आंदोलन केले. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. – व्ही. जी. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे

आपली प्रतिक्रिया द्या