
नवनाथ शिंदे
सहपोलीस आयुक्तांच्या वाहनांचा ताफा म्हटलं की हद्दीतील वाहतूक कर्मचाऱ्यांपासून ते पोलीस निरीक्षकांपर्यंत कडेकोट नियोजन केले जाते. प्रत्यक्षात मात्र, सहपोलीस आयुक्त दुचाकीवर येऊन नाकाबंदीची चौकशी करतील याची कोणालाही कल्पना नव्हती. पंरतु, काल संध्याकाळी नाकाबंदीदरम्यान दुचाकीस्वाराला अडविल्यानंतर चौकशी करताना कर्मचाऱ्यांना सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे पाहून आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर उपस्थित कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांनी कडक सॅल्युट करून नाकाबंदीची माहिती त्यांना दिली. दरम्यान, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाकाबंदीच्या कामगिरीवर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी ज्यांच्या आदेशानुसार रणनिती ठरविली जाते, असे पुण्याचे सहपोलीस डॉ. शिसवे यांनी काल संध्याकाळी दुचाकीवर प्रवास करून नाकाबंदीचा आढावा घेतला. नाकाबंदीदरम्यान वाहनचालकांकडे विचारपूस केली जाते की नाही, याची माहिती घेण्यासाठी त्यांनी काल मास्क घालून दुचाकीवर प्रवास करण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा शिवाजीनगरमधील सिमला ऑफिस चौकात गेल्यानंतर त्यांना नाकाबंदीदरम्यान अडविण्यात आले. त्यावेळी आपण कुठे चालला आहात, प्रवासासाठी महत्वाचे काय कारण आहे, अशी विचारपूस कर्मचाऱ्यांनी केली.
सहपोलीस आयुक्त डॉ. शिसवे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांनी स्वतःची ओळख करून देत नाकाबंदीचा आढावा घेत असल्याचे सांगितले. सहपोलीस आयुक्त थेट दुचाकीवर आल्याचे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तत्काळ उपस्थितांनी कडक सॅल्युट करून त्यांना मानवंदना दिली.
त्यानंतर शास्त्री रस्त्यावरही डॉ. शिसवे यांना अशाच पद्धतीने नाकाबंदीत अडविण्यात आले. तेथील कर्मचाऱ्यांनीही त्यांना ओळखल्यानंतर सॅल्युट करून नाकाबंदीतील वाहनचालकांच्या तपासणीची माहिती दिली. दरम्यान, नाकाबंदीत कर्मचाऱ्यांनी विचारपूस केल्यामुळे डॉ. शिसवे यांनी समाधान व्यक्त केले आहे.



























































