जेष्ठ दाम्पत्याच्या मदतीला धावले पोलीस, मुलांचेही केले समुपदेशन

कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय ठप्प होता. त्यामुळे रिक्षाचे  हप्ते थकल्यामुळे फायनान्स कंपनीने रिक्षा जप्त केली. घरात खाण्यापिण्याचेही वांधे झाले होते. त्यामुळे पुण्यातील दोन मुलांनी त्यांच्या आई-वडिलांना आळंदी देवाची याठिकाणी सोडून देण्याचा प्रयत्न केला. मात्र काही सतर्क नागरिकांनी त्यांना विरोध केल्याने तसेच मुलांचे पोलिसांच्या भरोसा सेलने सपुपदेशन केल्याने त्यांनी आई वडिलांना परत घरी नेले. पोलिसांच्या जेष्ठ नागरिक कक्षाने त्या वृद्ध दाम्पत्याला किराणा साहित्य देउन मदतीचा हात देत माणूसकीचे दर्शन घडवले.

विश्वनाथ आणि सुभद्रा कांबळे (रा. मांजरी हडपसर) असे त्या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. या दाम्पत्याची मुलं रिक्षा चालवायची. मात्र कोरोनामुळे रिक्षाप्रवाशी न मिळाल्याने फायनान्सचे हप्ते थकत गेले. त्यामुळे संबंधित कंपनीने रिक्षा ओढून नेली. घरात खाण्या-पिण्यासाठी काहीही शिल्लक न राहिल्यामुळे रिक्षाचालकाच्या आई-वडिलांनी परिसरात भिक्षा मागण्यास सुरुवात केली. ते पाहवत नसल्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांनी आई-वडिलांना आळंदी देवाची याठिकाणी नेउन सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, आळंदीतील दक्ष नागरिकांनी त्यांना विरोध करीत माघारी पाठविले. त्यानंतर पुणे पोलिसांच्या भरोसा सेलने दोन्ही मुलांना बोलावून समुपदेशन केले. त्याशिवाय त्यांच्या आई-वडिलांना किराणा साहित्याचे वाटप केले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक स्वाती केदार-खाडे, चाबुकरस्वार, सोनवलकर, गलांडे यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या