घरात बसून पोलिसांची व्हर्चुअल अपॉइंटमेंट मिळवा; डेक्कन, पुणे पोलिसांचा उपक्रम

463
फोटो प्रातिनिधीक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पुणे पोलिसांनी व्ही अपॉइंटमेंट (व्हर्चुअल अपॉइंटमेंट) उपक्रम सुरु केला आहे. पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर नागरिकांना ऑनलाईन अपॉइंटमेंट दिली जाणार आहे. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून ऑनलाईनरित्या व्हिडिओ कॉलिंगद्वारे नागरिकांच्या समस्या सोडवण्यात येणार आहेत. डेक्कन, लष्कर, कोथरुड, चतुःशृंगी, कोंढवा पोलीस ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली. व्हिडिओ कॉलिंग पत्रकारपरिषेदत ते बोलत होते.

लॉकडाउनच्या काळात नागरिकांच्या तक्रारीची गैरसोय टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी टॅक्नोसॅव्ही उपक्रमाची सुरुवात केली आहे. व्ही अपॉइंटमेंटद्वारे कोणत्याही नागरिकाने पोलिसांच्या वेबसाईटमध्ये तक्रारीची नोंदणी केल्यानंतर त्यांना ई-मेलद्वारे पासवर्ड दिला जाणार आहे. त्यानंतर एक ते दोन दिवसांत अधिकाऱ्ंयाकडून तक्रारदाराला ऑनलाईन व्हिडिओ कॉलिंग करुन प्रतिसाद दिला जाणार आहे. शहरातील डेक्कन, लष्कर, कोथरुड, चतुःश्रृंगी आणि कोंढवा पोलीस ठाण्यातंर्गत व्ही अपॉइंटमेंट सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर काही दिवसांत उर्वरित सर्व पोलीस ठाणे आणि वाहतूक विभाग कार्यालयात उपक्रम सुरु केला जाणार आहे. संबंधित उपक्रमाचे सर्व रेकॉर्ड ठेवले जाणार असून नागरिकांचा फीडबॅक घेतला जाणार आहे. शहरातील सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून तक्रार देण्यासाठी जास्तीत जास्त व्ही अपॉइंटमेंट ऑनलाईनचा वापर करण्याचे आवाहन डॉ. शिसवे यांनी केले. संबंधित व्ही अपॉइंटमेंट उपक्रम राबविण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. बच्चन सिंह यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक कपील भालेराव यांनी काम केल्याचे त्यांनी सांगितले.

तातडीच्या मदतीसाठी 100 क्रमांकाला फोन करा
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व्ही अपॉइंटमेंट उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मात्र, तातडीच्या मदतीसाठी नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्ष 100 क्रमांकाला संपर्क साधवा. त्यामुळे विविध घटनांवर तातडीने नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय विविध तक्रारींसाठी ऑनलाईनरित्या व्ही अपॉइंटमेंटचा वापर करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या