पोलिस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता, उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीत नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलासह पिंपरी-चिंचवडमधील मोठ्या पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला मंत्रालयातील बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार वाघोली, ऊरळीकांचन, बाणेर, काळेपडळ, खराडी, फुरसुंगी, म्हाळुंगे, रावेत, शिरगाव या नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार अशोक पवार, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, गृह विभागाचे अपरमुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अपरमुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल, ‘पीएमआरडीएचे’ आयुक्त सुहास दिवसे (व्हीसीव्दारे), पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते. पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील तीन झोनचे रुपांतर पाच झोनमध्ये करणे, कायदा-सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने आणि योग्य व्यवस्थापनासाठी पोलिस ठाण्याचे विभाजन करण्यात आले. त्याशिवाय कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शिरुरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला तत्वत: मान्यता देण्यात आली. शहरासह जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था काटेकोरपणे राबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

वाहन खरेदीसाठी डीपीसीमधून निधी देणार

नव्याने विभाजन करण्यात आलेल्या पोलीस ठाण्यांना वाहन खरेदीसाठी पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून निधी देण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे शहर पोलीस आयुक्तालयाला आणि जिल्हा ग्रामीण पोलीसांना वाहन खरेदीसाठी प्रत्येकी 1 कोटी देण्यात येणार आहेत. त्याशिवाय पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला 2 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यांचे विभाजन

पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात लोणीकाळभोर, वाघोली आणि लोणीकंद पोलीस ठाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यातून नवीन वाघोली पोलीस ठाणे, लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातून उरळीकांचन पोलीस ठाणे, हवेली पोलीस ठाण्यातून नांदेड सिटी पोलीस ठाणे, चतु:शृंगी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातून बाणेर पोलीस ठाणे, हडपसर-कोंढवा आणि वानवडी पोलीस ठाण्यातून काळेपडळ आणि फुरसुंगी पोलीस ठाणे, चंदननगर पोलीस ठाण्यातून खराडी पोलीस ठाणे, त्याशिवाय पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव अशा नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्यात आली आहे.