
लॉकडाउनमध्ये कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत हॉटेल सुरू ठेवणाऱ्या मालकासह 41 तळीरामांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाई केली आहे. मांगडेवाडीतील सई गार्डन हॉटेलमध्ये मद्यपान करणाऱ्याविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्याठिकाणावरील 12 दुचाकी, रिक्षा आणि मोटार असा मिळून 7 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे बीट मार्शल दुधाळे आणि शिंदे शनिवारी रात्री हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मांगडेवाडीतील पेट्रोल पंपाच्या बाजूला सई गार्डन हॉटेल परिसरात दुचाकी उभ्या असल्याचे त्यांना दिसून आले. संशय आल्यामुळे त्यांनी हॉटेलमध्ये जाउन पाहणी केली असता, त्याठिकाणी 35 ते 40 जण मद्यपान करीत असल्याचे दिसून आले. त्यानुसार बीटमार्शल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी जाउन हॉटेलचे मालक महेश लोणारे आणि गणेश घाटे यांच्यासह 41 जणांना ताब्यात घेतले. तेथून 5 हजार 740 रूपयांची दारू, 12 दुचाकी, रिक्षा, मोटार असा मिळून 7 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक प्रकाश पासरलकर, श्रीधर पाटल, परशुराम पिसे, राजू वेगरे, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, प्रणव संपकाळ यांच्या पथकाने केली.

























































