पुण्यात हिट अॅण्ड रन प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यात आली होती. पण फक्त ओरोपीच्याच नव्हे तर गाडीत उपस्थित असलेल्या त्याच्या मित्रांचेही ब्लड सॅम्पल बदलण्यात आले होते. इतर मित्र दारूच्या नशेत नव्हते हे सिद्ध करण्यासाठी ही हेराफेरी करण्यात आली होती.
पोर्शे अपघात प्रकरणी डॉ. अजय तावरे याची पुन्हा चौकशी होणार आहे. अजय तावरे हा ससून रुग्णालयात न्याय वैद्यक शास्त्र विभागाचा प्रमुख होता. तावरेनेच अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने फेकून आरोपीच्या आईचे रक्ताचे नमुने घेतले होते. त्यामुळे आरोपी दारूच्या नशेत नव्हते असे प्रथमदर्शनी दिसले होते. आता येरवडात कारागृहात तावरेची पुन्हा चौकशी होणार आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन आठवड्यांपूर्वी 900 पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले होते. अल्पवयीन मुलाने अपघात केल्यापासून त्याला वाचविण्यासाठी कुटुंबातून तसेच ससून रूग्णालयाच्या पातळीवर अपघात करणार्या अल्पवयीन मुलाचेच रक्त बदलण्यात आले. यामध्ये बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या सांगण्यावरून त्याचा बांधकाम व्यावसायिक मित्र याने निवृत्त सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकार्याच्या मदतीने डॉ. तावरेची ओळख काढली होती. त्यानंतरच पैशांसाठी डॉ. तावरे याच्या सांगण्यावरून डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी अपघात करणार्या अल्पवयीयन मुलासह त्याच्या मित्रांचेही रक्त बदलले होते. यासाठी डॉ. हाळनोर याला अडीच लाख रुपये तर तर घटकांबळेला 50 हजार रूपये मिळाले होते. यात अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांची भुमिका महत्वाची होती. तर विशाल अगरवालची पत्नी शिवानी हिचे रक्त अल्पवयीन मुलाचे रक्त म्हणून तपासणीसाठी देण्यात आले होते, हे तपासात निष्पन्न झाले आहे.
न्यायिक प्रक्रीयेतून बेकायदेशीररित्या सोडवणे, महत्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी पुरव्यांशी छेडछाड करणे, न्यायदानाच्या प्रक्रीयेत बाधा आणण्यासाठी तपास यंत्रणांची दिशाभूल केली. त्यासाठी बनावटीकरण केले. डॉ. हाळनोर रक्त नमुने बदलण्याची जेवढा जबाबदार आहे. तेवढाच रक्त बदलण्यास सांगणारा डॉ. तावरेही जबाबदार असल्याचा ठपका या प्रकरणात ठेवण्यात आला आहे. यासाठी अगरवाल कुटुंबियांकडून चार लाख रूपये देण्यात आले होते असेही समोर आले आहे.
घटकांबळे याला त्यातील तीन लाख देण्यात आले होते. त्यातील एक लाखाचा हिशोब पोलिसांना लागत नसल्याने त्याचा तपास डॉ. तावरेकडे करायचा आहे. पोलिसांकडून ठेवण्यात आलेल्या ठपक्यामध्ये त्यांनी डॉ. तावरेचा गुन्ह्यात प्रत्यक्ष व सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे म्हटले आहे. त्याला यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ झाला असून इतर स्वरूपाचा मोठा लाभ संबंधितांकडून देण्याची हमी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याच्या दृष्टीने व डॉ. तावरे याच्यासह अन्य आरोपींकडून मिळालेली माहिती याचे धागेदोरे जुळविण्यासाठी गुन्हे शाखेकडून तावरेची कारागृहात जाऊन चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. गुन्हे शाखेला तपासासाठी ही परवानगी मिळाली आहे.