बहिणीच्या रिसेप्शन समारंभात फोटो काढणे पडले पावणेसहा लाखांना, रेसिडन्सी क्लबमध्ये ऐवजाची चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नानंतर रिसेप्शन समारंभात फोटो काढणे नवरीच्या भावाला महागात पडले आहे. त्यांनी खुर्चीवर ठेवलेली 5 लाख 70 हजारांच्या ऐवजाची चोरट्यांनी चोरी केली आहे. त्यामध्ये रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा ऐवज होता. ही घटना 3 मे रोजी रात्री दहाच्या सुमारास क्वीन्स गार्डन परिसरातील रेसीडन्सी क्लबमध्ये घडली. याप्रकरणी एकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार संगणक अभियंता असून माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहेत. त्याच्या बहीणीचे 3 मे रोजी क्वीन्स गार्डन परिसरातील रेसीडन्सी क्लबमध्ये रिसेप्शन होते. त्या निमित्ताने स्वागत समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तक्रारदाराने पिशवीत साडेपाच लाखांची रोकड, दागिने, मोटारीच्या चाव्या ठेवल्या होत्या.

स्वागत समारंभ सुरू असताना त्यांना फोटो काढण्यासाठी बोलाविण्यात आले. धावपळीत त्यांनी ऐवजांची पिशवी खुर्चीवर ठेवली. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी पिशवी चोरून नेली. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमऱ्यांचे चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके तपास करत आहेत.