
मंदिरातील दानपेटी चोरी करणार्या सराईताचा पाठलाग करुन त्याला जेरबंद करण्यास वानवडी पोलिसांना यश आले आहे. संबंधित आरोपी सराईत असून यापुर्वी त्याच्यावर अनेक ठिकाणी घरफोडी व मंदिरातील दानपेटी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.अनिल हौशिलाल चव्हाण वय २२ रा. येरवडा मुळ – जवळा बाजार, ता. औंढा, जि. परभणी असे अटक केलेल्याचे नाव आहे.
चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी वानवडी पोलिस घोरपडी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एकजण संशयास्पदरित्या हातात दानपेटी घेउन जाताना पथकाला दिसून आले. पोलीसांना पाहुन तो दानपेटीसह जोरात पळत सुटला. मात्र, उपनिरीक्षक अजय भोसले यांच्यासह पथकाने पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घोरपडीतील लक्ष्मी माता मंदीरातून दानपेटी चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, एसीपी पौर्णिमा तावरे यांच्याा मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक संदिप शिवले उपनिरिक्षक अजय भोसले, राजु रासगे, विनोद भंडलकर, महेश गाढवे, अमोल गायकवाड विठ्ठल चोरमले यांनी केली .
































































