
वंशाला दिवा पाहिजे या हट्टासाठी आता पुणे ग्रामीण भागातही गर्भलिंग निदान करण्याचे लोण पोहोचले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्त्री जन्मदर कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मोटारीतून गावोगावी फिरून गर्भलंग निदान करणाऱ्या टोळीचा इंदापूर उपजिल्हा रूग्णालयासह पोलिसांनी नुकताच पर्दापाश केला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून गर्भलिंग निदान करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बीड जिल्ह्यातील स्त्री भू्रण हत्या प्रकरणानंतर राज्यातील काही भागात बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणे उघडकीस आली होती. त्यानंतर जिल्हा रूग्णालयासह उपजिल्हा रूग्णालयाकडून ठिकठिकाणी छापे टाकून बेकायदा गर्भलिंग निदान केंद्रांचा पर्दापाश केला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा नव्याने बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे लोण ग्रामीण भागात सुरू झाल्याचे उघडकीस आले आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर परिसरात मोटारीत बसून बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दापाश करण्यात उपजिल्हा रूग्णालयासह पोलिस प्रशासनाला यश आले आहे. मात्र, मोटारीतील बेकायदा गर्भलिंग निंदान केंद्राची पाळेमुळे आणखी खोलवर रूजली आहेत का, याप्रकरणी तपास खोलवर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
इंदापूरमध्ये ग्रामीण भागात मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविले जात असल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष खामकर यांना मिळाली होती. त्यानुसार 13 मे रोजी वैद्यकीय तज्ज्ञ आणि पोलिसांच्या पथकाने मोटारीचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. त्यावेळी इंदापूर-अकलूज रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या दाम्पत्य मोटारीत बसले. त्यानंतर भरधाव वेगाने मोटार भांडगाव परिसरात एका ओढ्याजवळ थांबली. त्याठिकाणी संबंधितांकडून बेकायदा गर्भलिंग निदान करण्यास सुरूवात करण्यात आली. मात्र, पथकाने छापा टाकून पाहणी केली असता, मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविले जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार मोटार चालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून मोटार आणि गर्भलिंग निदान यंत्रणा जप्त करण्यात आली. प्रवीण पोपटराव देशमुख (वय 32, रा. राजळे, जि. सातारा), तौशिफ अहमद शेख (वय 20, रा. दोघे रा. राजळे, जि. सातारा) यांच्यासह एका विरोधात विरोधात इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी देशमुख एका रोगनिदान केंद्रात तंत्रज्ञ असून त्याच्या विरोधात गर्भधारणा पूर्व प्रसव, पूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) 1994 च्या सुधारित 2003 कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, उपजिल्हा रूग्णालय पथकाने केली.
कायद्याचे उल्लंघन केल्यास 3 वर्षे कैद
गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्यानुसार गर्भलिंगनिवड गुन्हा आहे. सोनोग्राफीसारख्या तंत्राचा वापर करून गर्भाचे लिंग जाणून घेता येउ नये, यासाठी 1992 मध्ये कायद्याची निर्मिर्ती करण्यात आली. याचे उल्लंघन केल्यास गुन्ह्यासाठी 3 वर्षांपर्यंत कैद आणि 10 हजार दंडाची शिक्षा होऊ शकते. मात्र, गर्भलिंग निदान उघडपणे होत नसल्यामुळे तक्रारींचे प्रमाणही अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, गर्भपात कायदा विशिष्ट परिस्थितीत गर्भपात करण्यास मंजुरी देतो. आईच्या किंवा बाळाच्या जीवाला धोका असल्यास, अत्याचार झालेला असल्यास गर्भपात करता येतो. परंतु हा कायदा गर्भलिंग निवड करून नंतर केलेल्या गर्भपाताला परवानगी देत नाही.
बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राची माहिती द्या
मोटारीत बसून बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दापाश झाल्यामुळे उपजिल्हा रूग्णालयाने खबरदारी घेतली आहे. त्यानुसार आता ग्रामीण भागात अशापद्धतीने गर्भलिंग निदान होत असल्यास पोलिसांसह उपजिल्हा रूग्णालयाला माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
























































