मुंबईत ड्यूटी करून आलेल्या एसआरपीएफच्या तीन जवानांना कोरोनाची लागण; 95 जणांचा जीव धोक्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील रामटेकडीत असलेली एसआरपीएफ ग्रुप दोनची 100 जवानांची तुकडी मुंबईत कोरोना संचारबंदीच्या बंदोबस्तासाठी गेली होती. दीड महिन्यानंतर ड्युटी करून पुण्यात आलेल्या तुकडीतील तीन जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत सर्वांना एकाच हॉलमध्ये ठेवण्यात आले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतरही जवानांचे चेकअप किंवा त्यांचे विलगीकरण केले नाही. त्यामुळे 95 जवानांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे जवानांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनविरुद्ध लढा देण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस इमानइतबारे काम करीत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे एसआरपीएफची मदत घेतली जात आहे. पुण्यातील रामटेकडी परिसरातील एसआरपीएफची 100 जवानांची तुकडी मुंबईत पाठविण्यात आली होती. तेथून त्यांना विभागून भेंडीबाजार, डोंगरी, येरवली आणि वरळी भागात बंदोबस्त देण्यात आला होता. हे जवान दीड महिना येथे तैनात होते. बंदोबस्त झाल्याने ते सोमवारी रामटेकडीला परत आले आहेत. मात्र आल्यानंतर त्या सर्वांना येथील एकाच अलंकार हॉलमध्ये ठेवण्यात आले.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्याची तपासणी करण्यात येत आहे. मंगळवारी काही जणांना त्रास होऊ लागल्याने 14 जणांची कोरोनाची टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर या सर्वांचे विलगीकरण करून वेगवेगळ्या ठेवणे अपेक्षित होते. परंतु वरिष्ठांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. 24 तासानंतरही हे जवान अलंकार हॉलमध्येच होते. तेथे जवानांना अंघोळ करण्यास एकच नळ असून सर्वांची खानावळही एकच आहे. त्यामुळे सर्वांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. बुधवारी 6 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात आणखी एकाला लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वरिष्ठांना ही माहिती देऊनही अद्याप आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी नेले नसून काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्याचे येथील एका जवानांने सांगितले आहे. तसेच आमच्या लवकर टेस्ट करून आम्हाला कोरोना झाला असेल तर लवकर उपचार तरी करावे, अशी मागणी जवानांनी केली आहे.

मुंबईतून सोमवारी जवानांची तुकडी शहरात आल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामधे तुकडीतील 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनतर सर्वच जवानांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, जवानांना एकाच हॉलमध्ये ठेवले नाही.
– राम कुमार, प्रमुख, एसआरपीएफ ग्रुप दोन