
शस्त्राचा धाक दाखवून लुटमार केल्याच्या घटना शहरात अनेकदा घडल्या आहेत. मात्र, मोबाईल अॅपमुळे नागरिकांकडे ऐवज मिळत नसल्यामुळे आता चोरटेही टेक्नोसॅव्ही झाल्याचे दिसून आले आहे. दुचाकीवर निघालेल्या तरुणाला अडवून धमकावित तिघांनी गुगलपेद्वारे तीन हजार रुपये ट्रान्सफर करुन घेत फसवणूक केली आहे.
ही घटना तीन दिवसांपूर्वी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास धायरीतील डीएसके विश्व ते नांदेड फाटा परिसरात घडली. याप्रकरणी केतन श्रीकृष्ण पाटील (वय 32, रा. धायरी) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केतन कामामध्ये व्यस्त असल्यामुळे फिर्याद उशीरा दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन एका खासगी कंपनीत कामाला असून डीएसके विश्वमध्ये राहण्यास आहेत. तीन दिवसांपुर्वी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ते दुचाकीवरून मित्रांच्या घरी चालले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडवून दुचाकीची चावी काढून घेतली. दुचाकी फोडण्याची धमकी देउन गुगल पेवरून जबरदस्तीने 3 हजार रुपये वर्ग करण्यास भाग पाडले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सतीश उमरे तपास करीत आहेत.




























































