
खरेदी करण्याच्या बहाण्याने इलेक्ट्रिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानात शिरून दोन चोरट्यांनी गल्ल्यातील 30 हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना कर्वेनगरमध्ये घडली. याबाबत अनिल चुरी (वय – 40, रा. धायरी, सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कर्वेनगरमधील संजय गांधी वसाहतीत अनिल यांचे इलेक्ट्रिक साहित्य विक्रीचे दुकान आहे. आठ दिवसांपूर्वी ते एका सोसायटीत दुरुस्तीच्या कामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा दुकानात थांबला होता. इलेक्ट्रिक साहित्याची खरेदी करण्यासाठी अनिल यांनी बँकेतून आणलेली काही रोकड गल्ल्यात ठेवली होती.
दुपारी तीनच्या सुमारास दोन चोरटे दुकानात खरेदीच्या बहाण्याने आले. त्यांच्या मुलाला दोन हजार रुपये देऊन इलेक्ट्रिक साहित्य खरेदी केले. त्यानंतर चोरट्यांनी मुलाला वायर बंडल देण्याची मागणी केली. मुलगा बंडल देण्यासाठी गेला असता चोरट्यांनी गल्ल्यातील 30 हजारांची रोकड काढून दुचाकीवरुन पसार झाले. याप्रकरणी पोलीस हवालदार काळे तपास करत आहेत.
































































