बादली खरेदीच्या बहाण्याने 55 हजार लांबवले; पुण्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात स्टेशनरी दुकानातील प्लॅस्टिकची बादली खरेदीच्या बहाण्याने तीन चोरट्यांनी मालकाचे आणि कामगाराचे लक्ष दुसरीकडे वळवून 55 हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे. कोरेगाव पार्कमधील रियल चॉईस स्टेशनरीमध्ये दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी शेषाराम राठोड (वय 38, रा. कोरेगाव पार्क) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्कमधील गेरा गार्डन सोसायटी परिसरात शेषाराम यांचे स्टेशनरीचे दुकान आहे. दोन दिवसांपुर्वी तिघेजण बादली खरेदीच्या निमित्ताने दुकानामध्ये आले. त्यापैकी एकाने कामगाराला दुकानाबाहेरील प्लॅस्टिकची बादली देण्यासाठी दुकानाबाहेर बोलाविले. दुसऱ्या चोरट्याने शेषाराम यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यावेळी तिसऱ्या चोरट्याने त्यांच्या गल्ल्यातील 55 हजारांची रोकड चोरुन नेली. चोरटे दुकानातून निघून गेल्यानंतर गल्ल्यातील रोकड लंपास झाल्याचे शेषाराम यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेश गायकवाड तपास करीत आहेत.