
घरफोडी करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा शस्त्रधारी सराईतांनी पोलिसावर चाकूहल्ला केला. मात्र, कर्मचाऱ्याचे नशीब बलवत्तर असल्यामुळे रेनकोट आणि वॉकीटॉकीमुळे त्यांना इजा झाली नाही. अखेर वारजे माळवाडी पोलिसांनी चोरट्यांवर फिल्मी स्टाईल झडप घालून अटक केली. त्यांच्याकडून कटावणी, सुरा सोन्याचे दागिने, चांदीची भांडी आणि दुचाकी असा 1 लाख 48 हजार 217 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही घटना काल मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास वारजे माळवाडी येथील जिजाऊ गार्डन येथे घडली. सागरसिंग कालुसिंग जुन्नी (वय 27, रा. वैदुवाडी, हडपसर), जलासिंग जर्मनसिंह जुन्नी (वय 35, रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी, शिवाजीनगर) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी सद्दाम शेख, फिरोज शेख व शिरसाठ काल मध्यरात्री पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी आंबेडकर चौकाजवळील जिजाई गार्डन येथील साईराम व्हिला सोसायटीत दोन चोरटे घरफोडी करीत असल्याचा फोन रहिवाशांनी वारजे पोलिसांना केला. त्याबरोबर बीट मार्शल शेख, फिरोज आणि शिरसाठ तातडीने तेथे दाखल झाले. पोलिसांची चाहूल लागताच चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता कर्मचाऱ्यांनी त्यांना अडविले. त्यावेळी एका चोरट्यांने पोलिस कर्मचारी सद्दाम शेख यांच्यावर चाकूने हल्ला केला. मात्र, वार त्यांच्या खिशातील पाकिटाला लागून रेनकोट फाटला, त्यामुळे त्यांना दुखापत झाली नाही. दोघे चोरटे इमारतीच्या मजल्यावरून खाली उडी टाकून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी शिरसाठ व फिरोज शेख त्यांना पकडून ठेवले. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले अधिक तपास करीत आहेत.
वारजे पोलिसांचा क्वीक रिस्पॉन्स
सोसायटीत चोरटे शिरल्याची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर अवघ्या 3 मिनीटात बीट मार्शल शेख, फिरोज आणि शिरसाठ घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे चोरट्यांना रंगेहात पकडता आले. दोघेही चोरटे सराईत असून चोरी करताना कोणी अडथळा केल्यास ते शस्त्राने वार करण्याची पद्धत अवलंबित असल्याची माहिती तपास पथकाचे अधिकारी अशोक येवले यांनी सांगितले आहे.
























































