पाच वर्षांत तीनदा बदलला अकरावीचा अभ्यासक्रम

142

सामना प्रतिनिधी । पिंपरी

इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमात गेल्या पाच वर्षांत तीन वेळा बदल करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. एकीकडे एक वर्षाचा अभ्यासक्रम लक्षात ठेवण्याची घेतली जाणारी मेहनत आणि परीक्षेनंतर मिळणारे फळ यावर याचा निश्चितच परिणाम होत आहे, तर राष्ट्रीय प्रवेश परीक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

अकरावीचा अभ्यासक्रम या आधी 2012-13 आणि 2013-14 या वर्षात बदलण्यात आला होता. लागोपाठ झालेल्या बदलानंतर पाच वर्षांचे स्थित्यंतर तेवढे काय ते या अभ्यासक्रमाला प्राप्त झाले होते. तोच पुन्हा आता येत्या आगामी शैक्षणिक वर्षापासून (2019-20) अकरावीचे नवे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहे. एकूणच दहावीत घोकंपट्टी करून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुन्हा एकदा नव्या अभ्यासक्रमाला सामोरे जाणार आहेत. विशेष म्हणजे जे विद्यार्थी दहावी अनुत्तीर्ण आहेत आणि त्यांना अकरावीत प्रवेश मिळाला आहे, अशांच्या बुद्ध्यांकाचा यावेळेस कस लागणार आहे. यापूर्वी साधारण दहा वर्षांनंतर पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम बदलण्यात येत असत. मात्र, आता पाच वर्षांतच पुस्तकांची फेररचना करण्यात येत आहे.

आगामी शैक्षणिक वर्षी (2019-20) अकरावी आणि बारावीची पुस्तके बदलण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली आहे. अभ्यास मंडळासाठी सदस्यांची निवड प्रक्रिया विद्या परिषदेकडून सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी दहावी, आठवी आणि पहिलीचे पुस्तक बदलण्यात आले. त्यानंतर आता अकरावी आणि बारावीची पुस्तके बदलण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली आहे. राज्यातील प्रवेश परीक्षांची रचना, राष्ट्रीय प्रवेश परीक्षा असे अनेक बदल झाले. राज्याच्या सध्याच्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी राष्ट्रीय प्रवेश परीक्षांमध्ये मागे पडतात, अशी टीकाही अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांवर झाली. त्या अनुषंगाने परीक्षेच्या आराखड्यातही काही बदल राज्य मंडळाने लागू केले. मात्र, आता येणारी पुस्तके ही राष्ट्रीय प्रवेश परीक्षा नजरेसमोर ठेवून करण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे, असे सूत्रांनी सांगितले. दहावीची पुस्तके बदलल्यानंतर त्याच्या पुढील वर्षी अकरावीची पुस्तके बदलणे आवश्यक असते. जेणेकरून दोन्ही पुस्तकांच्या रचना, आराखडे यांतील तफावत भरून निघेल. त्याचप्रमाणे पाच वर्षांतच पुस्तके बदलणे आवश्यक आहे. दरम्यानच्या काळात अनेक गोष्टी अद्ययावत झालेल्या असतात. त्याचा समावेश पुस्तकांमध्ये होणे गरजेचे असते, असे मत विषय शिक्षकांनी व्यक्त केले.

पाच वर्षांत झाले बदल

अकरावीसाठी अभ्यासक्रमात असलेली पुस्तके 2012-13 आणि 2013-14 या शैक्षणिक वर्षांत बदलण्यात आली होती. विज्ञान शाखेची पुस्तके 2012-13 मध्ये, तर वाणिज्य आणि कला शाखेची पुस्तके 2013-14 मध्ये बदलण्यात आली होती. त्यानंतर आता 2019-20 या शैक्षणिक वर्षांत अकरावीचे नवे पुस्तक तर त्याच्या पुढील वर्षी म्हणजे 2021-22 मध्ये बारावीचे नवे पुस्तक लागू होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या