
दुचाकी रस्त्यात पार्किंग केल्याच्या रागातून तीन अल्पवयीन मुलांनी कोथरूडमधील म्हातोबा नगर परिसरातील चार दुचाकी पेटवून दिल्या. त्यामुळे पसरलेल्या आगीत रस्त्यावरील एकूण 9 दुचाकींचे नुकसान झाले आहे. रविवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास लावलेल्या आगीमुळे एका दुचाकीच्या टाकीचा स्फोट झाला. त्यानंतर परिसरातील रहिवाशांनी आगीची माहिती अग्निशमक दलासह पोलिसांना माहिती दिली.
अल्पवयीन मुलांनी दुचाकी पेटवून दिल्यामुळे संकेत ज्ञानोबा उभे, सुजीत चव्हाण, राजू राठोड, हेमंत राठोड, भास्कर चव्हाण, शशिकांत जाधव यांच्या दुचाकींचे नुकसान झाले. याप्रकरणी संकेत ज्ञानोबा उभे यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहरातील कोथरुड परिसरात गुन्हेगारी कमी होण्याचे दिसून येत नाही. दिवसाढवळ्या सराफी दुकानावर दरोडा टाकून सोन्याचे दागिने चोरुन नेण्याची घटना ताजी असतानाच अल्पवयीन मुलांनी दुचाकी जाळल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या दहशतीत भर पडली आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी करीत आहेत.
























































