
सामना प्रतिनिधी, पुणे
हीरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटीची सोमवारी बंगळुरू एफसीविरुद्ध लढत होत आहे. दोन्ही संघांच्या आघाडीची फळी मजबूत असल्याने ही लढत अतिशय चुरशीची होणार आहे. पुणे सिटी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील घरच्या मैदानावर खेळणार असले तरी त्यांच्यासाठी पहिला विजय मिळवणे अवघड असेल. प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावरील (अवे) पहिल्या दोन सामन्यांतून पुण्याला एकच गुण मिळवता आला. हा संघ नवव्या क्रमांकावर आहे.
बंगळुरू एफसी हा हिंदुस्थानातील सर्वोत्तम संघ असल्याचे मला वाटते. दुसऱया मोसमात बहुतांश खेळाडू कायम ठेवून ते खेळत आहेत. त्यांनी केवळ दोन-तीन खेळाडू बदलले आहेत. संघ कायम असणे फार महत्त्वाचे असते. अल्बर्ट रोका गेले असले तरी नवे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात त्यांच्यासारखेच आहेत. कार्यपद्धतीमध्ये सातत्य ठेवणे महत्त्वाचे असते, असे मत पुण्याचे प्रशिक्षक मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांनी व्यक्त केले. विजयाची नितांत गरज असलेल्या यजमान पुण्याने सामना जिंकल्यास तो त्यांचा मोसमातील आणि बंगळुरूवरीलसुद्धा पहिलाच विजय असेल. गेल्या मोसमात बंगळुरूविरुद्ध ते प्ले ऑफमध्ये हरले होते.
पोर्तुगाल यांनी पुढे सांगितले की, आम्ही फार चांगली तयारी करीत आहेत. आम्हाला बंगळुरूच्या जमेच्या आणि कमकुवत बाजूंची चांगली माहिती आहे. आम्ही आमच्या काही कल्पना आखल्या आहेत. विजय कसा मिळवायचा याची योजना आम्ही तयार केली आहे. बंगळुरूने गेल्या मोसमात दमदार पदार्पण केले. यंदा मात्र त्याची सुरवात तेवढी सफाईदार झालेली नाही. सलामीला त्यांनी गतविजेत्या चेन्नईयीन एफसीवर प्रभावी विजय मिळवला, पण घरच्या मैदानावर जमशेदपूर एफसीने त्यांना बरोबरीत रोखले. आता ते प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावरील सामने (अवे) खेळण्यासाठी दौऱयावर आहेत. गेल्या मोसमात त्यांनी नऊपैकी सात ‘अवे’ सामने जिंकले होते. तो सूर पुन्हा मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील असतील.
summary- pune vs bengaluru in isl league

























































