पोहताना मित्राची टिंगल करीत त्याला कठड्यावरून विहीरीत ढकलून दिल्यामुळे तरूणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील फुरसुंगी परिसरातील शेवाळेमळामध्ये घडली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेहमान अन्सारी असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रोहित प्रदीप कदम आणि सिद्धार्थ म्हासोळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहमान, रोहित आणि सिद्धार्थ मित्र असून मांजरी बुद्रूक परिसरात राहायला आहेत. 7 एप्रिलला तिघेही मित्र शेवाळेमळा परिसरातील एका विहीरीत पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी रेमहान विहीरीच्या कठड्यावर उभा होता.
अचानकपणे आरोपी रोहितने त्याला विहीरीत ढकलून दिले. पायर्यावर पडून रेहमान पाण्यात पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाला. रोहित आणि सिद्धार्थने त्याला पाण्याबाहेर न काढता पळ काढला. घटनेबाबत कोणालाही माहिती होऊ नये यासाठी सिद्धार्थने रेहमानचा मोबाईल फेकून दिला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस तपास करीत आहेत.
























































