
सामना प्रतिनिधी। पुणे
राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेत 20 गुणांच्या तोंडी परीक्षा रद्द करण्याचे जाहीर केले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाला पालकांनी विरोध केला असून शिवसेना व युवासेनेनेही यास पाठिंबा दिला आहे. यापार्श्वभूमीवर आज शिवसेना व युवासेनेनेही राज्य बोर्डाच्या कार्यालयावर धडक दिली. युवासेनेच्या मागणीचा सकारात्मक विचार करणे योग्य राहील असे लेखी शिफारस पत्र बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे आणि विद्या प्राधिकरण चे संचालक डॉ. सुनील मगर यांनी शासनाला आणि पदाधिकाऱ्यांना दिला.
दहावीसाठी नवीन अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके व मूल्यमापन आराखडा यांची अंमलबजावणी करण्यात आल्यानंतर भाषा विषयासाठी निर्धारित केलेली तोंडी परीक्षा 20 गुण तसेच सामाजिक शास्त्रे विषयासाठी निर्धारित केलेले अंतर्गत मूल्यमापनाचे 20 रद्द करून संपूर्ण 100 गुणांची लेखी परीक्षा आयोजित केली आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या वेळी बसणार असून इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांप्रमाणे राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यास हे गुण मिळत असल्याने 10 वी चे विद्यार्थी आणि त्यांचे पालक प्रचंड तणावाखाली आहेत. त्यामुळे तोंडी आणि अंतर्गत गुण रद्द करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा. यासाठी शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले .
शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाळा कदम, शहर प्रमुख माजी आमदार चंद्रकांत मोकाटे ,महादेव बाबर ,युवा सेना संपर्कप्रमुख रुपेश कदम, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रवीण पाटकर ,सुप्रिया करंडे, स्मिता झगडे ,मुंबई महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य साईनाथ दुर्गे ,विशाल धनवडे ,किरण साळी, केतन सावंत, सचिन बांगर, प्रवीण थोरात, पवन जाधव, निखिल जाधव ,निरंजन दाभेकर, कुणाल धनवडे यांच्यासह मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पालक सहभागी झाले होते.
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनाही युवा सेनेने निवेदन दिले होते . ऑनलाईन सह्यांची मोहीम सुद्धा राबवण्यात आली. परंतु शालेय शिक्षण विभागाकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्यामुळे, जवळपास 16 लाख 75 हजार विद्यार्थ्यांवर मंडळाकडून अन्याय होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी तोंडी परीक्षा संदर्भातील बदल हा विद्या प्राधिकरणाकडून झाला असून यंदापासून बोर्ड त्याची अंमलबजावणी करत आहे, असे सांगितले .तेव्हा पदाधिकाऱ्यांनी विद्या प्राधिकरण यांच्या संचालकांना बैठकीला बोलावण्याची मागणी केली. काही वेळातच प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर मंडळात आले . ऑक्टोबरमध्ये निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना अडचणीत आणले आहे. सीबीएससी सह अन्य बोर्डाकडून तोंडी परीक्षाना जास्त मार्क दिले जातात .राज्य बोर्डाने तोंडी मार्क कमी केल्याने हे विद्यार्थी त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे तातडीने हा निर्णय रद्द करा. अशी मागणी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली .प्रश्नांची जोरदार सरबत्ती केल्यानंतर डॉ. काळे आणि डॉ.मगर यांनी यासंदर्भात शासनाला लेखी पत्र देण्याचे मान्य केले .तोंडी परीक्षेचे गुण रद्द करण्याच्या निर्णयावर शिवसेना युवासेना विविध घटक आणि पालकांकडून आलेल्या तक्रारी लक्षात घेता ,या संदर्भात शासन स्तरावर सकारात्मक विचार करणे योग्य राहील असे शिफारस पत्र त्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर सचिवांना दिले. त्याची प्रत शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.



























































