
‘पुण्याची ओळख एकेकाळी शिक्षणाचे, संस्कृतीचे शहर अशी होती, मात्र आज ते ‘गुंडांचे शहर’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. सत्ताधाऱ्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तिकिटे दिली आहेत. गुंडगिरी, दादागिरीशिवाय सत्ताधारी पक्ष निवडणुका जिंकूच शकत नाही,’ असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर केला. पुण्यातील जनता सुजाण असून, मतदानातून ही गुंडगिरी गाडल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करीत भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी ‘मशाल’ पेटवा, असे आवाहन त्यांनी केले.
बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज प्रभाग क्रमांक 38 आणि कोंढवा बुद्रुक–येवलेवाडी प्रभाग क्र. 40 मधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राज्य संघटक वसंत मोरे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. आज पुण्यात गुंड टोळ्यांची दहशत वाढली आहे. पुण्यातल्या कोयत्याला ‘राष्ट्रीय हत्यार’ म्हणून मान्यता दिली पाहिजे. ही परिस्थिती सत्ताधाऱयांच्या अपयशामुळे निर्माण झाली आहे. गुन्हेगारीवर कठोर कारवाई करण्याऐवजी गुंडांना, त्यांच्या नातेवाईकांना निवडणुकीची तिकिटे दिली आहेत. दाऊद किंवा छोटा शकील भेटला असता तरी त्यांनाही तिकीट दिले असते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
…तर भाजप शिंदेंना लाथ मारून हाकलेल
‘शिंदेंची शिवसेना ही अमित शहा यांची कंपनी आहे. कायद्याने शिवसेना नाव आणि चिन्ह आम्हालाच द्यावे लागणार असल्याने तारीख पे तारीख सुरू आहे. एकदा का चिन्ह मिळाले, की भाजप शिंदेंना लाथ मारून हाकलून देईल,’ असा घणाघात संजय राऊत यांनी केला.






























































