
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांची प्रकृती बिघडली असल्याची बातमी समोर आली आहे. त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. संगरूरहून परतल्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात नेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, संगरूरच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री भगवंत सिंह यांचा रक्तदाब अचानक वाढला, त्यानंतर त्यांची घटनास्थळी तपासणी करण्यात आली. जेव्हा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही, तेव्हा त्यांना ताबडतोब हेलिकॉप्टरने मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले आहे.
‘टीव्ही९ भारतवर्ष’ने दिलेल्या वृत्तानुसार, भगवंत मान हे हेलिकॉप्टरने चंदीगडला जात होते. विमानात त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना थोडी अस्वस्थता जाणवत होती आणि खबरदारी म्हणून त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचताच तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी सुरू केली आहे.
























































